परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक : ‘लक्ष्मीअस्त्र’ चा प्रभाव, मतविभागणीची खेळी
परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल २२ जून रोजी जाहीर झाला असून, महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सईद खान यांनी पहिल्या पसंतीक्रमाची २४२ मते मिळवून विजय प्राप्त केला आहे. “ऑपरेशन टायगर” च्या माध्यमातून खासदार संजय जाधव यांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सईद खान यांच्या विजयाने परभणीच्या राजकारणात एका नव्या समीकरणाला जन्म दिला आहे. या निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीत झालेली मतविभागणी आणि ‘लक्ष्मीअस्त्राचा’ भडिमार जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे.
मतविभागणीची खेळी आव्हानात्मक
परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक मतदारसंघात एकूण ४६६ मतदार होते. राष्ट्रवादी काँग्रेस १३१, भारतीय जनता पक्ष ९९ आणि
शिवसेना ७७ असे महायुतीचे प्रत्यक्ष संख्याबळ ३०७ होते. त्यात यशवंत सेनेचे २७ आणि जनसुराज्य पक्षाचे १३ जोडल्यास महायुतीकडे तब्बल ३४७ मतांचे भक्कम पाठबळ होते. त्या तुलनेत महाविकास आघाडीकडे काँग्रेस ५९ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४३ असे केवळ १०२ मते होती. परंतु, प्रत्यक्षात विजयी झालेल्या महायुतीच्या सईद खान यांना अवघी २४२ मते मिळाली. म्हणजेच महायुतीच्या हक्काच्या संख्याबळातून तब्बल १०५ मतांची मोठी मतविभागणी झाली. याउलट, आघाडीचे उमेदवार डॉ.विवेक नावंदर यांनी १५९ मते पटकावली. आघाडीची स्वतःची मते केवळ १०२ असताना नावंदर यांनी ५७ अतिरिक्त मते खेचून आणली. दुसरीकडे, अपक्ष उमेदवार सुशीलकुमार यांनी ५६ मते घेत महायुती व आघाडीच्या दोन्ही गोटात सुरुंग लावला.
अंतर्गत बेबनाव, असमन्वय उघड
या मतदारसंघात महायुती आणि आघाडीतील नेत्यांमधील अंतर्गत बेबनाव, असमन्वय आणि छुपी नाराजी सुरुवातीपासूनच उघड होती. हीच नाराजी कॅश करण्यासाठी कॉंग्रेसचे सुशीलकुमार सुरेशराव देशमुख यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली आणि लढत तिरंगी झाली. निवडणुकीच्या अंतिम ४ दिवसांत तिन्ही उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘लक्ष्मीअस्त्राचा’ सढळहस्ते वापर केला. परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्यातील मतदारांनी या ‘अर्थपूर्ण’ लढाईत तिन्ही बाजूंकडून लाभ उठवल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे मतदानाची गणिते कमालीची बदलली.
वैयक्तिक जनसंपर्क, विकासकामांचा लाभ
महायुतीतील मतविभागणीचा फटका बसूनही शिवसेनेचे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य सईद खान यांचा विजय सुकर झाला, यामागे त्यांचे पाथरी आणि परभणी परिसरातील मजबूत स्थानिक जाळे कारणीभूत ठरले. २०२४ च्या पाथरी विधानसभा निवडणुकीत त्यांनी रासपकडून लढताना ५५ हजार मते घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक विकास महामंडळ आणि विविध केंद्र व राज्य सरकारच्या योजनांतून सईद खान यांनी केवळ पाथरी मतदारसंघात ९५० कोटींची विविध विकासकामे केली. आणि कार्यकर्त्यांची मोट बांधली. याचा परिणाम म्हणून २०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीत पाथरीत नगराध्यक्ष आणि ९ नगरसेवकांसह शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यासह, सोनपेठ व मानवतमध्ये नगरसेवक निवडून आणण्यात सईद खान यशस्वी ठरले. २०२६ च्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बाजार समिती निवडणुकीतही त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. महायुती अंतर्गत समन्वयाचा अभाव आणि नाराजी असताना, खान यांनी वैयक्तिक जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर विधानपरिषद एंट्री केली असली, तरी मोठ्या प्रमाणावर झालेले मतविभाजन भविष्यातील निवडणुकांसाठी महायुतीला आत्मपरीक्षण करायला लावणारे ठरणार आहे.
…आता ‘खान आणि बाण’ एकत्र नांदणार : परभणी महापौर निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परभणीत सय्यद इकबाल यांना महापौरपद दिले होते, तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “हा त्यांचा खरा चेहरा आहे आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले,” अशी घणाघाती टीका केली होती. मात्र, राजकीय गणिते बदलताच शिंदे यांच्या शिवसेनेने कट्टर समर्थक आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सईद खान यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले. आणि सईद खान यांनी संधीचे सोने करत विजय मिळवला. यामुळे प्रत्येक निवडणुकीत आजवर ‘खान हवा की बाण’ असा उघड प्रचार करणाऱ्या शिवसेनेत आता ‘खान आणि बाण’ एकत्र नांदणार हेही या निवडणुकीने स्पष्ट केले आहे.
