अनावश्यक खर्चाला फाटा देत माजी आमदार बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा उपक्रम
परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी, ११ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २२ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हार-तुरे-शाल, पोस्टरबाजी किंवा अन्य अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जनहितासाठी योगदान द्या’ या त्यांच्या आवाहनाला जिंतूर-सेलू मतदारसंघातील बोर्डीकर प्रेमी, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या एकत्रित प्रयत्नातून जमा झालेली रक्कम २२ लाख रुपये नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, प्रभाकर वाघीकर, सुनिल भोंबे, अभिजित पारवे, गजानन बोर्डीकर, नामदेव आवटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.





