जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : १३० मतदान केंद्र, ५३३ कर्मचारी, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

सेलू जि.परभणी : सेलू् तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असून, तालुक्यातील १३० मतदान केंद्रावर मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथके दुपारी रवाना झाली असून नियुक्त मतदान केंद्रावर दाखलही झाली आहेत.
जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण १ लाख २ हजार ३६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून १३० मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक सुरक्षा आणि पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.निवडणूक प्रक्रियेत एकूण ५३३ कर्मचारी, १३ झोनल अधिकारी तसेच ३७१ पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. ११ बस, ४४ लहान वाहन (क्रुझर) वापरण्यात येत आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

शुक्रवारी सकाळी सेलू तहसील कार्यालय परिसरात मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य ताब्यात घेऊन तपासून घेण्यासाठी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी उदय जाधव, नायब तहसीलदार विजय मोरे, जयश्री कोल्हे, सहायक महसूल अधिकारी हरिष टाक आदींची उपस्थिती होती. अशोक राऊत, प्रताप शेरे, शेख नूर, विजय सोंजे, विकास मुपडे यांच्यासह मास्टर ट्रेनर आणि निवडणूक विभाग तसेच महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत.






