चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; राधा-कृष्णाच्या वेशभूषेने वेधले उपस्थितांचे लक्ष
वाशिम : मंगरुळपीर येथील वाय.सी. सीबीएसई स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे आणि संस्थेचे सचिव चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेतील शिक्षकांच्या नियोजनबद्ध सहभागातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सणांविषयी आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले.यावेळी अनेक चिमुकले विद्यार्थी श्रीकृष्ण, राधा तसेच गोप-गोपींच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांच्या निरागस अभिनयाने आणि मनमोहक वेशभूषेने कार्यक्रमस्थळी आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित सादरीकरणे, भक्तिगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व, भगवान श्रीकृष्णांचे बालपण, त्यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग तसेच प्रेम, मैत्री, सत्य आणि कर्तव्य यांसारख्या मूल्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सण साजरे करण्यामागील सांस्कृतिक आणि सामाजिक संदेशही समजावून सांगितला.चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीशी जोडण्याचा शाळेचा प्रयत्न या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वाय.सी. सीबीएसई स्कूलमध्ये जन्माष्टमीचा उत्सव आनंदमय आणि अविस्मरणीय ठरला.
वार्तांकन : फुलचंद भगत, वाशिम





