विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ‘कौन बनेगा करोडपती’च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘कोण होणार ज्ञानपती’ ही सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, गणितीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक विषयांवरील प्रश्नांना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने उत्तरे दिली. पुढील स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढावे या उद्देशाने आयोजित या उपक्रमातील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली.बक्षिसांची रक्कम माणिक काजळे व राजेंद्र गाडेकर यांनी दिली. कार्यक्रमाची संकल्पना व सूत्रसंचालन लक्ष्मण गाडेकर यांनी केले, तर प्रश्नावलीसाठी माधव गव्हाणे यांनी सहकार्य केले.या वेळी ग्रामस्थ, महिला व अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादासाहेब गाडेकर, पांडुरंग गाडेकर, बाबाजी ठोक, धोंडीराम गाडेकर, भागवत सोळंके, वेदांत गाडेकर, पार्थ गाडेकर, वैभव खाडे, मंडळाचे सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.





