पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर
परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी पिकांवर आलेले संकट आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हिम्मत खचू देऊ नका, असा धीर दिला.
कुंडी, ता. सेलू येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही”, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.हदगाव शिवार, (ता. पाथरी), सारोळा खु., (ता. पाथरी), सावळी, ता.मानवत, पोखर्णी, ता.परभणीअकोली, ता. गंगाखेड, बोरी (ता. जिंतूर) येथे प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यथा जाणून घेतल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे. दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले, वीज बिल माफ केले. दुष्काळाच्या परिस्थितीतही सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. सर्वोतोपरी मदत शेतकरी बांधवांना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.पिकांची केली पाहणी, जाणून घेतल्या व्यथापालकमंत्री बोर्डीकर यांनी यावेळी शेतातील पिकांची अवस्था, पावसाची स्थिती आणि संभाव्य नुकसानीबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. बांधावरच ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. पिकांवर खर्च केलेला पैसा, डोळ्यांत उभ्या केलेल्या अपेक्षा आणि पावसाअभावी हातातून निसटत चाललेले पीक… या साऱ्या वेदना शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे आस्थेवाईकपणे ऐकून घेतले. तुमच्या अडचणी केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष बांधावर येऊन समजून घेणे गरजेचे आहे. तुमच्या नुकसानीची दखल घेऊन आवश्यक मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता कमी करणे, त्यांच्या नुकसानीची दखल घेणे आणि त्यांना शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देणे, हीच प्राथमिकता आहे. केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.जिल्ह्यातील पावसाच्या कमतरतेमुळे खरीप पिकांवर परिणाम झाल्याची पार्श्वभूमी असून, प्रशासनाने पीकस्थिती, पीकविमा, पाणी व चारा उपलब्धतेसह संभाव्य टंचाईच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. संकट मोठे आहे; मात्र शेतकरी एकटा नाही, शासन त्याच्या पाठीशी आहे, हा विश्वास देत पालकमंत्र्यांची बांधावरची ही भेट शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली.
पाहणी दरम्यान उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, जीवराज डापकर, संगीता चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांच्यासह संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शासनाच्या निर्देशानुसार पिकांचे नुकसान आणि परिस्थितीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याच्या प्रक्रियेलाही यामुळे गती मिळणार आहे, असे आश्वासित केले.
पिकंच नाही; आयुष्याचं करपलंय
पावसाने ओढ दिल्याने नुसती खरीप पिकेच करपलंय नाहीत तर शेतकऱ्यांचे आयुष्यचं करपलंय. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून पीक विमा तसेच नुकसानभरपाई तत्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खाती जमा करावीत, अशी मागणी जोर धरीत आहे.





