सेलूतील वसंत प्रतिष्ठानच्या व्याख्यानात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे आवाहन, स्वदेशीचा दिला नारा

सेलू : इतिहासाचा अभ्यास असेल तरच वर्तमान आणि भविष्य चांगले घडविता येईल. त्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिशांनी केलेले केवळ सत्तेचे हस्तांतरण नव्हे, तर प्रत्येक भारतीयाने स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे, असे आवाहन दिल्ली येथील प्रसिद्ध पत्रकार आणि प्रखर राष्ट्रभक्त पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी सेलू (जि.परभणी) येथे केले.
कै. वसंतराव खारकरमामा यांच्या स्मृतिदिनानिमित्त वसंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘विश्वगुरु भारत’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा श्री.केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे सचिव महेशराव खारकर आणि अॅड. उमेशराव खारकर यांनी श्री.कुलश्रेष्ठ यांचे स्वागत केले. आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रखर राष्ट्रभक्ती, सनातन धर्म सभत्येवर केंद्रीभूत व्याख्यानात श्री.कुलश्रेष्ठ यांनी स्वातंत्र्यचा खरा अर्थ आणि विश्वगुरू भारताचे महत्त्व जोरसकपणे पटवून दिले.
१५ ऑगस्ट १९४७ नंतरही देशात इंग्रजांचे अनेक कायदे आजही लागू असल्याची जळजळीत वास्तव मांडून याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या राजकारण्यांवर टीका करताना, साडेदहा लाख हिंदूंच्या हत्येनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. कुलश्रेष्ठ यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील घटना, सध्याची देशातील परिस्थिती, भारतीयांची मानसिकता आणि धर्म म्हणजेच कर्म यावर भाष्य केले.
हिंदूंच्या हातात सत्ता असूनही काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून हाकलून दिले गेले, ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी परखड टीका केली. ते पुढे म्हणाले, राष्ट्राला सरकार नाही, तर समाज चालवतो. भारत कधीही जातीवादी नव्हता, तर कर्मवादी होता. इंग्रजांनी पेरलेले जातीभेदाचे विष राजकारण्यांनी स्वातंत्र्यानंतर वाढवले. यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले. मतदान आणि धर्म यांच्या संकल्पनांचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सनातन सभ्यता आणि संपूर्ण भारत हा विश्वगुरू आहे, हे त्यांनी पटवून दिले. विदेशी वस्तूंचा दैनंदिन वापर थांबविण्याचे आवाहन करत स्वदेशीचा नारा दिला, आणि केवळ भौतिक सुखाच्या मागे न धावता जीवनाचा खरा आनंद घ्या. सजग राष्ट्रभक्त नागरिक बनण्यासाठी कटिबद्ध व्हा, असेदेखील आवाहन श्री.कुलश्रेष्ठ यांनी केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता आणि कै. अॅड.वसंतराव खारकर यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले. प्रकाश कुरुंदकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सच्चिदानंद डाखोरे आणि पूजा तोडकर यांनी वंदे मातरम् राष्ट्रगान गायीले. सूत्रसंचालन नीलेश बिनायके यांनी केले. अॅड. उमेश खारकर यांनी आभार मानले. व्याख्यानाला विविध स्तरातील मान्यवर, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.






