सेलूतील ‘एक दिवस, एक पुस्तक’ उपक्रमाचे ३२ वे पुष्प
सेलू : “मराठवाडा मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठीचा नसून, तो खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा लढा होता. निजामशाहीच्या जुलमी राजवटीविरुद्ध मराठवाड्यातील जनतेने प्राणांची बाजी लावून संघर्ष केला,” असे प्रतिपादन नूतन महाविद्यालयाचे प्रा. हनुमान व्हरगुळे यांनी केले. ते ‘एक दिवस – एक पुस्तक’ या उपक्रमातील चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन कन्या प्रशालेचे सहशिक्षक डॉ. बाबासाहेब थोरे होते.स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालय, सेलू यांच्या वतीने ‘एक दिवस – एक पुस्तक’ हा मासिक उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमातील ३२ वे पुष्प कौस्तुभ दिवेगावकर यांच्या “मराठवाडा १९४८ मुक्तिसंग्रामाचा समकालीन शोध” या ग्रंथावर चर्चा आयोजित करून गुंफण्यात आले. हरिती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथात मराठवाडा मुक्ती संग्रामातील विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण वेध घेण्यात आला आहे.
आपल्या भाषणात प्रा. व्हरगुळे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, तसेच स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, विनायकराव चारठाणकर आणि विठ्ठलराव शिंदे यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे महत्त्वपूर्ण योगदान सांगितले. त्यांनी रझाकारांच्या दहशतीला तोंड देत झालेला सशस्त्र आणि नि:शस्त्र संघर्ष, ग्रामीण जनतेचा सहभाग, तसेच शेतकरी व कामगारांनी दिलेल्या योगदानाचाही सखोल आढावा घेतला. या चर्चेतून तरुण पिढीला स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रेरणादायी दर्शन घडले.या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांच्या प्रास्ताविकाने झाली. संतोष बोरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर बाळू बुधवंत यांनी आभार मानले. या वेळी रघुनाथ देशमुख, संपतराव झोडगावकर, के.जी.कुलकर्णी, रमा बाहेती, जयंत नाईक, जी.ए. गुंजकर, सिद्धार्थ वाघमारे, मोहन पाटील, पूनमचंद खौना, गौतम सूर्यवंशी, विठ्ठल साबळे यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





