जिल्हा परिषदेच्या ५४ जागांसाठी २४७, तर पंचायत समितीच्या १०८ जागांसाठी ४३३ उमेदवार नशीब अजमावणार
परभणी : परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत २७ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर आता अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ५४ जागांसाठी २४७, तर पंचायत समितीच्या १०८ जागांसाठी ४३३ असे एकूण ६८० उमेदवार रिंगणात आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील एकूण ५४ जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आता २४७ उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण ४४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १६२ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये ९२ पुरुष आणि ७० महिला उमेदवारांचा समावेश आहे.तालुकावार स्थिती पाहता, जिंतूर तालुक्यात ३९ उमेदवार, मानवत २१, सोनपेठ १३, परभणी तालुक्यात ५६, सेलूमध्ये १९, पाथरीमध्ये २६, गंगाखेडमध्ये २८, पालममध्ये १६ आणि पूर्णा तालुक्यात २९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. पंचायत समिती : ४३३ उमेदवार रिंगणातपरभणी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांमधील १०८ निवडणूक गणांसाठी एकूण ४३३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.प्रशासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यात पंचायत समितीसाठी एकूण ७६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २७ जानेवारी २०२६ या माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत ३१२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता परभणी पंचायत समितीमध्ये सर्वाधिक ९३ उमेदवार रिंगणात असून जिंतूरमध्ये ६४, पाथरीमध्ये ५३ उमेदवार, गंगाखेडमध्ये ४७, मानवतमध्ये ३३, सेलूमध्ये ३२, पालममध्ये २९, पूर्णा ५५ आणि सोनपेठ पंचायत समितीसाठी २७ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आगामी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी या सर्व जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिता भालेराव यांनी प्रसिद्ध केली आहे.





