सेलू तालुक्यातील प्रकार, रस्ता आणि पूलाच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक
सेलू : राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मतदारसंघातील चिकलठाणा बुद्रुक जिल्हा परिषद गटातील बोथ व बोथ तांडा (ता.सेलू) गावातील ४६६ मतदारांनी गावाला रस्ता व पुल उभारण्यात यावा अशी आग्रही मागणी करीत, मतदान न करण्याची ईश्वर शपथ घेऊन मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे उलटले तरी बोथ या गावास अद्यापही रस्त्यासारखी मूलभूत सुविधा नाही. गावाजवळील करपरा नदीवर पूल नाही. त्यामुळे आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीत करपरा नदीला पूराचा पाणी गावात शिरल्याने शेळ्या, बैल वाहून गेले होते. घरातील धान्य व संसार उपयोगी वस्तू नागरिकांच्या डोळ्या समोर पाण्यात वाहून गेल्याने मोठे अर्थिक नुकसान झाले. सरकारने तुटपुंजी मदत करून नुकसानग्रस्तांचे अश्रु पुसण्याचे प्रयत्न केले.
पोटच्या बाळाला गमावल्याची वेदना
मागील पंधरा दिवसापूर्वी बोथतांडा येथील एका महिलेला प्रस्तुती साठी वेळेवर औषधोपचार मिळाले नसल्याने आपल्या पोटच्या बाळाला गमवावे लागले तर महिला मृत्यूचा दाढेतून बालंबाल बचावली. याच्या वेदना कुटुंबाला असह्य झाल्या आहेत. वाई, बोथ व बोथतांडा अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. वाई येथे १ मतदान केंद्र आहे. या ठिकाणी पुरुष ५४५ , स्त्री ५५३ असे एकूण १०९८ मतदार आहेत, तर बोथ व बोथ तांडा स्वतंत्र मतदान केंद्र असून या ठिकाणी पुरुष २१२, स्त्री २५४ असे एकूण ४६६ मतदार आहेत.
मन वळवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अयशस्वी
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची ग्रामस्थांनी भेट घेऊन निवेदन दिले होते. जिल्हा, तालुका प्रशासनाकडे निवेदन देऊन रस्ता व पुल उभारण्यात यावा या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा संताप नागरिकांकडून मतदानाच्या दिवशी शनिवारी व्यक्त करण्यात आला. सेलूचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव, चारठाणा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी दळवे, सरपंच सुधीर आघाव यांनी बोथ येथे भेट घेऊन मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ते अयशस्वी ठरले. बहिष्कार टाकून ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.
” मागील अनेक वर्षांपासून सरकार दरबारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे सातत्याने रस्ता व पुल उभारण्यात यावा, अशी तोंडी, लेखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्ता उपलब्ध नसल्याने आरोग्य, शिक्षण इतर सुविधा उपलब्धतेनुसार मिळत नाहीत. नागरिकांची हेळसांड होत आहे. करपरा नदीचा पुराचा गावास वेढा पडतो. कित्येक दिवस विजपुरवठा खंडित होतो. रस्त्याचा व पूलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला पाहिजे ” – सुनिता डोंगरे, पोलिस पाटील बोथ, ता.सेलू जि.परभणी
मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...