आमदार राहुल पाटील यांची विधानसभेत मागणी
परभणी : राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी विशेष घरकुल योजना राबवून त्यांना व्यवसायासाठी दर्शनी भागात २०० फुटांची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत केली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत सरकारकडून दिव्यांग बांधवांना प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल उपलब्ध करून देण्यासह रॅम्पची व्यवस्था केली जाईल आणि मागणी करणाऱ्या दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या घरकुल आणि व्यावसायिक जागेचा प्रश्न उपस्थित केला. सन २००७ मध्ये तत्कालीन शासनाने दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी ते ज्या भागात राहतात, तिथे २०० फुटांची व्यावसायिक जागा देण्याची योजना जाहीर केली होती. परंतु, आजपर्यंत किती जणांना याचा लाभ मिळाला याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. परभणी जिल्ह्यात अद्याप कोणालाही या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.यावर उत्तर देताना ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, मुंबई व इतर शहरांत दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल दिले आहेत. परभणीत याबाबत चौकशी करून मागणी करणाऱ्या दिव्यांग बांधवांना निश्चितपणे जागा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच त्यांना विविध घरकुल योजनांचा लाभ देऊन घरांसाठी रॅम्पची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांच्या व्यावसायिक जागेचा आणि घरकुलाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.




