
सेलूत कीर्तन व महाप्रसादास भाविकांची गर्दी
सेलू : सेलू येथील स्वामी विवेकानंद नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी श्री संत जगद्गुरु गजानन महाराज पुण्यतिथी महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
या महोत्सवानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी ५ ते ९ या वेळेत भाविकांकडून श्रींना अभिषेक घालण्यात आला, तर सकाळी ९.३० वाजता विधिवत महाअभिषेक पार पडला. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनास भाविकांनी गर्दी केली होती. मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाली. त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महिला मंडळाच्या सुश्राव्य भजनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद नगरातील सर्व रहिवासी तसेच मंदिर कार्यकारी मंडळाने परिश्रम घेतले.





