जिंतूर तालुका प्रेस क्लबचे विजय चोरडिया यांचा सामाजिक उपक्रम; सफाई कामगारांना साडीचोळी वाटप

जिंतूर/ प्रतिनिधी : सामाजिक भान ठेवत व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना साडीचोळीचे वाटप करून आणि घरोघरी पेपर वाटणाऱ्या ११ मुलांना प्रत्येकी १० लाखांची विमा पॉलिसी देऊन वाढदिवस साजरा केला.
व्हॉइस ऑफ मीडिया व जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश लाहोटी, नगराध्यक्ष प्रताप देशमुख, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, नायब तहसीलदार प्रशांत राखे, प्राचार्य श्रीधर भोंबे, उद्योजक ब्रिजगोपाल तोष्णीवाल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, बालरोग तज्ज्ञ डॉ. दुर्गादास कानडकर, डॉ. गणपत वाघमारे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष टीका खान पठाण, गटनेते सचिन गोरे, नगरसेवक शेख अथर, डॉ. आबासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती.
विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला कामगारांचा सन्मान करण्यात आला. तसेच दररोज पहाटे घराघरात वर्तमानपत्र पोहोचविणाऱ्या जिंतूर शहरातील मुलांच्या सुरक्षिततेसाठी १० लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला. हा स्तुत्य उपक्रम मागील १० वर्षांपासून अविरतपणे राबविण्यात येत आहे. समाजातील वंचित घटकांची नोंद घेऊन त्यांना मदतीचा हात देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले.
नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी विजय चोरडिया यांच्या या उपक्रमातून इतरांनी प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मनोज सारडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिंतूर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष मंचक देशमुख यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिंतूर तालुका व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष भागवत चव्हाण, सचिन रायपत्रीवार, संदीप माहूरकर, दिलीप देवकर, पंकज चव्हाण, बोरीचे अध्यक्ष आनंद मुरक्या, चारठाणाचे रंगनाथ गडदे, प्रभाकर कुरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





