‘फ्रीडम सीझन ३’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ७ कलाकृतींची निवड; ११ ते १३ ऑगस्टदरम्यान आयोजन
परभणी : परभणीच्या ग्रामीण भागातील चित्रकार सुशीलकुमार एन. घुंबरे ऊर्फ काका यांच्या सात कलाकृती मुंबईतील नेहरू सेंटर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सामूहिक चित्र प्रदर्शनात प्रदर्शित होणार आहेत. कला कनेक्ट आणि सिद्धार्थ कर्मकार आर्ट फाउंडेशनतर्फे ११ ते १३ ऑगस्ट २०२६ दरम्यान वरळी येथील नेहरू सेंटरच्या एसी आर्ट गॅलरीत ‘फ्रीडम सीझन ३’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काका यांच्या अॅक्रेलिक ऑन कॅनव्हास प्रकारातील सात कलाकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. यामध्ये ‘डिव्हिनिटी कार्व्हड इन स्टोन’, ‘द क्राय ऑफ द फॉरेस्ट’, ‘नेचर्स फ्लोरल हार्मनी’, ‘मेमरी इन ओल्ड सिटी’, ‘इन सर्च ऑफ लाईट’, ‘स्टील लाईफ’ आणि ‘डिवाईन गेझ’ या चित्रांचा समावेश आहे. पोर्ट्रेट, लँडस्केप, ॲब्स्ट्रॅक्ट, स्टील लाईफ व कंपोझिशन अशा विविध पाच प्रकारांतील विषयांची मांडणी हे या चित्रांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.मर्यादित साधनांमध्ये राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या काका यांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण परभणी जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे. ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान दुपारी १२ ते रात्री ७ या वेळेत रसिकांना नेहरू सेंटर येथे हे प्रदर्शन पाहता येणार आहे.




