
पाथरीत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरूद्ध संताप
पाथरी : जायकवाडी उपविभागाचे उपअभियंता व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कालवा क्रमांक ५९ चे पाणी शेतकऱ्यांच्या शेताऐवजी ओढ्या-नाल्यांतून वाया जात आहे. पाथरी तालुक्यात गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि ऊस ही पिके सुकू लागली आहेत. अशा गंभीर परिस्थितीत २९ ऑगस्ट रोजी बी-५९ चारीला पाणी सोडण्यात आले; मात्र सुरुवातीच्या गावांच्या चाऱ्या तब्बल १८ दिवसांपासून उघड्याच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या गावांना पाण्याचा थेंब मिळाला नाही.
उपअभियंता मुख्यालयी हजर राहत नसून कर्मचारीही चारीवर फिरकत नाहीत. शेतकऱ्यांनी पाणी बंद करण्याची विनंती करूनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. केवळ दोन दिवसांत पाणी सोडण्याचे पोकळ आश्वासन दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पाण्याचे समन्यायी वाटप न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या चाऱ्या बंद करून टेलच्या गावांपर्यंत पाणी पोहोचवावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
जायकवाडीच्या कालव्याच्या बी ५९ चारीचे पाणी देवनांद्रा येथून सुटल्यानंतर रामपुरी, ढालेगाव, पोहेटाकळी, तुरा, गुंज, कानसूर, लिंबा मायनर या भागातील शेत चार-चार वेळा भिजून पाणी ओढ्या-नाल्यांत वाहत आहे. दुसरीकडे वाघाळा, फुलारवाडी, लिंबा, वझूर, वांगी व विटा या शेवटच्या गावांतील पिकांना पाण्याचा थेंबही मिळालेला नाही.- कार्तिक घुंबरे, शेतकरी, वाघाळा ता.पाथरी




