स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी

वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षण हॉल येथे मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी ‘पोलीस पाटील करिअर शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक निकेश खाडमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
शिबिरात स्पर्धा फाउंडेशन, पुणे येथील राज्य समन्वयक प्रदीप कोरेडे आणि विभागीय प्रमुख आशीष इंगळे यांनी स्पर्धा परीक्षा, करिअरच्या विविध संधी, अभ्यासाचे नियोजन व यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक लता फड यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन करत मेहनत, शिस्त आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त पुस्तकांचेही वितरण करण्यात आले.या करिअर शिबिरास सुमारे २५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित राहून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस कल्याण विभागाचे पोउपनि प्रल्हाद पधाण, पोहेकॉ बेबी राठोड, पोलीस कल्याण प्रशिक्षक आशीष जंज्वाल व राहुल अवचार यांनी विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा मिळावी आणि पोलीस सेवेसह विविध क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले.





