पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग, धार्मिक वातावरणात हर हर महादेवचा जयघोष
वाशिम : मंगरुळपीर शहरालगत असलेल्या शहापूर येथे महिलांच्या पुढाकारातून भक्तीमय कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत काढण्यात आलेल्या या कावड यात्रेत परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
कावड यात्रेदरम्यान महिलांनी पारंपरिक पद्धतीने कावड सजवून ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’ अशा जयघोषात यात्रेत सहभाग घेतला. भक्तिभाव, एकजूट आणि धार्मिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या यात्रेने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.या कावड यात्रेत पुजाताई श्यामभाऊ खोडे, रेखा इंगोले, संगिता राऊत, सिमा जाधव, नलिनी राऊत, प्रिती इंगोले, पुष्पा इंगोले, सिमा ठाकरे, प्रणीती इंगोले, सुषमा इंगोले, पुनम फलटनकर यांच्यासह वावगे, भोयर, परळीकर, गोदुवाले, लुले, वाघ, ठाकरे, घुसळकर आदी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.महिला शक्तीचे दर्शन शहापूर येथील महिलांनी धार्मिक परंपरेचे जतन करण्यासोबतच सामूहिक सहभागातून सामाजिक एकतेचाही संदेश दिला. कावड यात्रेच्या निमित्ताने महिला मोठ्या संख्येने एकत्र आल्याने महिला शक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला.श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या भक्तीला विशेष महत्त्व असून, कावड यात्रेच्या माध्यमातून जलाभिषेकाची परंपरा जपली जाते. शहापूर येथील महिलांनी ही परंपरा उत्साहाने पुढे नेल्याने परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.महिलांच्या या भक्तिमय उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.





