सेलूतील विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम
सेलू : सेलू येथील विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी, २९ जुलै रोजी हुतात्मा स्मारक परिसरात आयोजित नागपंचमी महोत्सवाला महिला, तरूणींचा यावर्षीही मोठा प्रतिसाद मिळाला. महोत्सवातील विविध पारंपरिक कार्यक्रमांचा महिलांनी मनसोक्तपणे आनंद घेतला. महोत्सवाचे हे १५ वे वर्ष होते. उपस्थित महिलांच्या तसेच बोराडे परिवाराच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने
नागदेवता पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले.
सकाळी अकरापासून परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. मानाच्या पाच झोक्यांचा आणि विविध पारंपरिक स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी महिला व मुलींची अक्षरशः झुंबड उडाली होती. यानिमित्ताने संगीत खुर्ची, उखाणे, दोरीवरच्या उड्या, प्रश्नमंजुषा, फुगडी आदी पारंपारीक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. गायक नरेंद्र राठोड प्रस्तुत सप्तसुरांच्या मैफल या गीत संगीताच्या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली. महिला तसेच बच्चे कंपनींनींनी राहाट पाळण्याचा आणि झोक्यांचा मनसोक्त आनंद घेतला.
बच्चेकंपनीसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते. सहभागी महिलांना उकडीचे मक्याच्या कणिसाचे मेजवानी तसेच चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महोत्सव यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




