खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न आवश्यक : आमदार कल्याणकर
नांदेड : महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशनच्या मान्यतेने आणि नांदेड जिल्हा सेपक टकरा असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त २५ वी सब ज्युनियर आणि २६ वी ज्युनियर सेपक टकरा स्पर्धा २०२५-२६ चे नांदेड येथील जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉलमध्ये २९ ऑगस्ट रोजी शानदार उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचखंड गुरुद्वाराचे संत बाबा बलविंदर सिंघजी होते. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपस्थित होते.
याप्रसंगी नांदेड जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष सुशीलकुमार जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पाडमुखे, राज्य उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त हनुमंत लुंगे, प्रवीण कुपटीकर, आयोजन समितीचे सचिव रवि बकवाड, राज्य स्पर्धा समन्वयक डॉ. विनय मुन, राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, लक्ष्मण फुलारी, जिल्हा सचिव इक्बाल मिर्झा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ७२ संघांमधील एकूण ११५० खेळाडू, मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, पंच आणि राज्य पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनही करण्यात आले. यानंतर महाराष्ट्रातील ७२ संघांनी मार्च पास्ट करत प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे सचिव प्रवीण कुपटीकर यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना माजी आमदार बालाजीराव कल्याणकर म्हणाले, “या अभिनव क्रीडा प्रकारात खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून प्राविण्य मिळवावे.” त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले, “खेळाडूंनी नियमित मैदानावर खेळून तंदुरुस्त राहावे आणि आपले करीअर घडवावे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिर्झा आसिफ यांनी केले, तर जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी आभार प्रदर्शन केले. या स्पर्धेत ज्युनिअर मुले गटातील साखळी सामन्यांत जळगाव, अमरावती, वर्धा, नांदेड, नागपूर आणि नाशिकच्या संघांनी विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे.





