मानवत येथील व्याख्यानात डॉ.कैलास जवादे यांचे मत
मानवत : अवयवदानाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळू शकते. त्यामुळे या चळवळीविषयी व्यापक जनजागृती आवश्यक आहे, असे अवयवदान चळवळीचे प्रणेते मत डॉ.कैलास जवादे यांनी व्यक्त केले.
मानवत तालुका पत्रकार संघ आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.अंकुश लाड होते. व्यासपीठावर केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद जोशी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शेख आशेक हुसेन यांची उपस्थिती होती.
डॉ.जवादे म्हणाले, की ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचे अवयव इतर रुग्णासाठी संजीवनी ठरतात. मात्र आपल्या देशात अवयवदान संबंधी माहिती व योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे. योग्यवेळी निर्णय घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी यासंबंधी माहिती घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. उदय जैन यांनी अवयवदान संबंधी अनुभवकथन केले. डॉ.ओंकार झाडगावकर यांनी अवयवदान व देहदान संबंधी मार्गदर्शन केले.
डॉ.अंकुश लाड यांनी सांगितले की, गणेशोत्सवाचा माध्यमातून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यामुळे एक आदर्श निर्माण झाला आहे. अशा गणेशोत्सवाना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत. याप्रसंगी कीर्ती कत्रुवार, सरला कत्रुवार, भूषण बालकिशन चांडक यांनी अवयवदानाचा संकल्प केला. प्रास्ताविक प्रसाद जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार गोपाळ लाड यांनी मानले. कार्याध्यक्ष सचिन मगर, सचिव शामभाऊ झाडगावकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सचिन चिद्रवार, प्रा.मोहन बारहाते, संजय नाईक, के.डी.वर्मा, दिगंबर बाकळे आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.





