श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन
सेलू : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल डॉ. संजय रोडगे यांचा श्रीराम प्रतिष्ठान संचलित विविध संस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. रविवार, २३ सप्टेंबर रोजी विद्या विहार संकुल, रवळगाव रोड येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात कायदा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ॲडव्होकेट दत्ता कदम यांचाही सन्मान करण्यात आला. सत्कार सोहळ्याला सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे यांच्यासह विविध संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सर्व वक्त्यांनी डॉ. संजय रोडगे यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. शेतकरी आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपूर्वा तंत्रनिकेतनचे प्राचार्य अशोक बोडखे यांनी केले. दिगंबर टाके यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप आकात यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या सत्काराने परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.





