जागतिक हृदय दिनानिमित्त परभणीत जनजागृती
परभणी : हृदयरोग हे जगभरात मृत्यूंचे एक प्रमुख कारण आहे. हृदयरोगांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस “जागतिक हृदय दिन” म्हणून साजरा केला जातो. “एकही क्षण चुकवू नका” ही वर्ष २०२५ करिताची जागतिक हृदय दिनाची संकल्पना आहे. ही थीम हृदयाच्या आरोग्यासाठी सतत सतर्क राहण्याच्या महत्त्वावर भर देते, व्यक्तींना चेतावणीच्या चिन्हांकडे दुर्लक्ष न करता, निरोगी सवयी राखून, नियमित आरोग्य तपासणीचे वेळापत्रक तयार करून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांशी संबंधित मृत्यू टाळण्यासाठी वेळेवर वैद्यकीय मदत घेण्यास प्रोत्साहित करते.
हृदयरोगाबाबत जनतेमध्ये जागरूकता येण्यासाठी नेहमीच जिल्हा सामान्य रुग्णालय विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यासाठी परभणी जिल्ह्यात स्टेमी प्रकल्प राबवला जातो. “स्टेमी” म्हणजे ‘एसटी एलिवेशन इन मायोकार्डियल इन्फ्राकशन’ हा सामान्यतः आढळणारा हृदयविकाराचा प्रकार असून यात हृदयाच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा थांबल्यामुळे अपुऱ्या ऑक्सिजनअभावी हृद्याच्या मांसपेशीला इजा होते व त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ईसीजी तपासणीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून या कालावधीत जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण ५२८८ ईसीजी तपासण्या करण्यात आल्या आहेत. ३० वर्षांवरील वयातील १ लाख १२ हजार २१४ रुग्णांची रक्तदाब तपासणी करण्यात आली. त्यात हृदयवाहिन्यांच्या संबंधित आजाराचे ११ हजार ६७३, तर स्ट्रोकशी संबंधित आजाराचे रुग्ण ७९९ आढळून आले व त्यांच्यावर उपचार देण्यात आले.
हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताणतणावाचे व्यवस्थापन तसेच धूम्रपान व मद्यपानाचे सेवन टाळावे हे महत्त्वाचे आहे. तसेच जिल्हा रुग्णालय मार्फत रक्तदाब आणि रक्तशर्करा तपासणीसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. त्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी केले.





