पालकमंत्र्यांच्या मतदार संघातच विमाकंपनीचा मनमानी कारभार, सेलूतील शेतकऱ्यांचे निवेदन
सेलू : शेतकऱ्यांचा २०२४ या वर्षातील खरीप हंगामाचा पिक विमा मंजूर झालेला असतानाही केवळ नगर परिषद हद्दीचे जुजबी कारण देत आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचीत ठेवले आहे. मंजूर झालेला पिक विमा मिळावा यासाठी अतिवृष्टीने पिचलेल्या सेलूतील शेतकऱ्यांनी आक्रोश करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.सन २०२४ च्या खरीप हंगामात सेलू तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊसच न पडल्यामुळे उभी पिके वाळून गेली व हातातोंडाशी आलेला खरीपाचा हंगाम हिरावला गेला. शेकडो शेतकऱ्यांनी पिक विमा काढून, ई पिक पाहाणी, पिकांचा स्पॉट पंचनामा अशा पिकविम्याच्या मंजूरीसाठी असलेल्या सर्व नियम अटी पूर्ण केल्यामुळे पिक विमा मंजूरही झाला. मात्र, नतध्रष्ट विमा कंपनीने सेलू शिवार न. प. हद्दीत येत असल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना पिकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवले.
तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, कृषी उपसंचालक यांना या बाबत शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबत जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ अदा करण्याचे आदेशही दिले होते, परंतु मंजूर पिकविम्याचे घोडे नेमके का व कोणी अडवले हे कोडे मात्र अद्यापही उलगडत नाहीये. नुकत्याच अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या मोठ्या नुकसानीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड न केल्यास ऐन दिवाळीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या मतदार संघात आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपनीने खरीप २०२४ चा पिक विमा मनमानी कारभार करून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचीत ठेवल्यामुळे, या कंपनीवर पालकमंत्र्यांनीही कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर शिवकुमार नावाडे, विशाल लोया, चेतन फोपसे, सुभाष फोपसे, अरुण फोपसे, बापुसाहेब शेरे, महादेव शेरे, बबन शेरे, गोविंद शेरे, अश्वीन लोया, शाम शेरे, देवेंद्र नावाडे, नितीन कुलकर्णी, वाकणकर ऋषीराज, गजानन झमकडे, शिवराज सोळंके, प्रितेश लोया आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





