बीडीओ उदय जाधव यांचे मत, विवेकानंद विद्यालयात ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात
सेलू / प्रतिनिधी : विज्ञानाच्या रोमांचक आणि व्यावहारिक पैलूंचे प्रदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात विज्ञान प्रदर्शने सहाय्यभूत ठरतात. तसेच कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करतात, असे मत सेलू येथील गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी व्यक्त केले.सेलू पंचायत समिती व विवेकानंद विद्यालयाच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भविष्यातील शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषकांना विज्ञान प्रदर्शनातून प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, करुणा कुलकर्णी, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव आणि मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांची उपस्थिती होती.या प्रदर्शनात शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य व स्वच्छता, जलसंवर्धन व व्यवस्थापन आदी विषयांवर प्रयोग सादर करण्यात आले. प्राथमिक गटात ५१ तर उच्च माध्यमिक गटात १९ आणि शिक्षकांनी ७ प्रयोग सादर केले. प्रयोगांचे परीक्षण मिलिंद झमकडे, विलास खरात, योगेश पंडित, राहुल जाधव आणि सतीश साबळे यांनी केले.
गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी यावेळी बोलताना, पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विज्ञानाची समज निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये समस्या निराकरण कौशल्य विकसित व्हावे, यावर भर दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले, तर प्रास्ताविक नामदेव एकशिंगे यांनी केले. विज्ञान प्रदर्शन रूपरेषा अमोल गायकवाड यांनी सादर केली, तर आभार अनिल कौसडीकर यांनी मानले. तालुका विज्ञान समन्वयक पद्माकर आणि विवेकानंद विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
स्पर्धेचा निकाल:
प्राथमिक गट * प्रथम: कु. श्रेया चव्हाण व अनुष्का गजमल (उत्कर्ष विद्यालय सेलू) * द्वितीय: हर्षदीप चव्हाण (प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू) * तृतीय: हर्षदा मोगल व सिद्धी आवटे (नूतन कन्या शाळा सेलू)
माध्यमिक गट * प्रथम: दुर्गा मगर (नूतन विद्यालय) * द्वितीय: फैजल अन्सारी (शांताबाई नखाते विद्यालय वालुर) * तृतीय: स्वरा देशपांडे (नूतन कन्या शाळा) तर शिक्षक सादरीकरण प्रयोगांमध्ये प्राथमिक गटात उमेश क्षीरसागर (नूतन विद्यालय) आणि माध्यमिक गटात नारायण चौरे (ज्ञानतीर्थ विद्यालय) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.





