उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या पथकाची वाई शिवारात कारवाई
सेलू : सेलू तालुक्यातील वाई येथे सुरू असलेल्या अवैध गौणखनिज (वाळू) वाहतुकीवर प्रशासनाने कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी, ६ डिसेंबर रोजी ही कारवाई करून गौणखनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर जप्त केले आहे.
सध्या जिल्ह्यात गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर निर्बंध असतानाही, काही ठिकाणी अवैध वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या माहितीच्या आधारे, श्री. लाहोटी यांनी तातडीने तपासणी पथक तयार केले. वाई परिसरात तपासणी करत असताना, पथकाला अवैध वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर आढळून आला.
पथकाने तत्काळ हा ट्रॅक्टर जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तो सेलू येथील तहसील कार्यालयाच्या आवारात लावला आहे. या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी विजय बोधले आणि तलाठी ओम कानडे यांचा सहभाग होता. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध गौणखनिज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाने अवैध वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.





