जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रमात बदल; ९ फेब्रुवारी रोजी होणार मतमोजणी
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील उर्वरित टप्प्यांच्या नियोजनात हा बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारीनंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे, याचा विचार करून आयोगाने हे पाऊल उचलले आहे.सुधारित कार्यक्रमानुसार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. यामुळे जाहीर प्रचाराची मुदत ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता संपणार आहे. मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राजपत्रात प्रसिद्ध केली जातील. संबंधित जिल्हाधिकारी ३१ जानेवारी रोजी या सुधारित कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील.





