पांगरी येथील अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनातून समाजप्रबोधन
जिंतूर : तालुक्यातील पांगरी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कीर्तन सेवा झाली. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की, कलियुगातील माणसाचे जीवन हे बाह्य दिखावा किंवा पैशावर अवलंबून नसून ते त्याच्या शुद्ध चारित्र्यावर उभे असले पाहिजे. माणसाची खरी ओळख त्याच्या कर्तृत्वाने आणि चारित्र्यानेच निर्माण होते.
आजच्या धावपळीच्या युगात समाजात वाढत चाललेली मूल्यघसरण, अहंकार आणि स्पर्धावृत्ती यावर त्यांनी आपल्या खास शैलीत परखड भाष्य केले.कीर्तनादरम्यान महाराजांनी संतविचारांचे महत्त्व अधोरेखित केले. आई-वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत हे मानवी जीवनाचे चार मुख्य आधारस्तंभ आहेत. या स्तंभांपासून दूर गेल्यास मानवी जीवन दिशाहीन होते, असा इशारा त्यांनी दिला. केवळ पैसा सर्वकाही नसून, संतांच्या बोधामुळे मिळणारा हरिनामाचा ठेवा हाच जीवनातील खरा आनंद आहे. साधुसंगतीमुळेच जगात सर्वत्र ईश्वर पाहण्याची दृष्टी प्राप्त होते आणि त्यातूनच जीवनात स्थैर्य व समाधान निर्माण होते. चारित्र्य जपल्यास व्यक्तीचे व्यक्तिमत्व उजळून निघते, असा संदेश देऊन त्यांनी कीर्तनाची सांगता केली. या कार्यक्रमास परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





