सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्येविविध स्पर्धांच्या माध्यमातून विज्ञानाचा जागर
सेलू, जि.परभणी : क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर, सेलू यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विज्ञान आठवडा अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे.
या विज्ञान आठवड्यांतर्गत २४ फेब्रुवारी रोजी विविध स्पर्धा पार पडल्या. यामध्ये इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आधारित चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. माझा आवडता वैज्ञानिक, दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि पृथ्वीचे रक्षण या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता रंगांच्या माध्यमातून कागदावर उतरवली. विज्ञानाविषयीची आपली समज विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक चित्रांमधून व्यक्त केली.तसेच इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वादविवाद व भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नासा व इस्रो, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान बदल यांसारख्या समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती आणि आधुनिक विज्ञानाबाबतची जागरूकता स्पष्टपणे दिसून आली.हा विज्ञान आठवडा २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, यादरम्यान दररोज विज्ञानावर आधारित विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या सर्व स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून, प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीपणे पार पडत आहे.





