“आऊटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर” पुरस्कार जाहीर
परभणी दि.१५ : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील यु.एस. इंडिया एसएमई कौन्सिल, वॉशिंग्टन डीसी तर्फे “आऊटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर” हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार १४ मार्च २०२६ रोजी घोषित करण्यात आला आहे.
हा पुरस्कार २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्रात आणि विशेषतः परभणी जिल्ह्यात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, लखपती दीदी योजना प्रभावीपणे राबवणे, ग्रामीण महिलांसाठी सिल्क अँड मिल्क उपक्रम आणि एकल महिला सशक्तीकरण अभियान यांसारख्या योजनांद्वारे त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या सर्वांगीण विकासाच्या कामाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.
अमेरिका आणि भारत यांच्यातील आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असलेली यु.एस. इंडिया एसएमई कौन्सिल ही संस्था लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देते. नाविन्यपूर्ण उद्योजकता, पायाभूत सुविधा, ऊर्जा, शाश्वत विकास आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये ही संस्था जागतिक स्तरावर काम करते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या मोठ्या पुरस्कारामुळे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक संस्थांनी त्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.





