परभणी, दि. २३ : जिंतूर तालुक्यातील चारठाणा आणि बोरी येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी, परभणी यांच्या मार्फत शासनाकडे प्राथमिक स्वरूपाचा सकारात्मक प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता .दोन्ही ठिकाणी अपर तहसील कार्यालय सुरू व्हावे, अशी ठाम व न्याय्य भूमिका जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी सातत्याने मांडली होती.
बोरी येथे अपर तहसील कार्यालयास मंजुरी मिळाली नसल्याच्या गैरसमजातून काही नागरिकांनी आंदोलन व उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाची सविस्तर माहिती दिली. तसेच या विषयाबाबत मुद्दामहून पसरविण्यात आलेले गैरसमज दूर केले.
आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार, जिल्हाधिकारी, परभणी यांनी बोरी तसेच चारठाणा येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांची मागणी अधोरेखित करणारा सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे पाठविल्ण्यात आला होता अशी माहिती देण्यात आली. तसेच संबंधित प्रस्तावाची प्रतही आंदोलनकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आली.
प्रशासनाकडून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आल्यानंतर निर्माण झालेले गैरसमज दूर झाले असून, आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण व आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रश्नावर संवादाच्या माध्यमातून तोडगा निघाल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, चारठाणा व बोरी येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत दोन्ही ठिकाणच्या नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




