सुलभकांनी मांडले ‘मिशन उत्कर्ष’चे नियोजन, शिक्षकांचा मोठा सहभाग

सेलू | प्रतिनिधी : निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रथम शिक्षण परिषद २३ जूनरोजी येथील नूतन विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात झाली. या प्रसंगी विविध शैक्षणिक उपक्रम व निपुण परभणी अंतर्गत शाळेच्या प्रगतीचे टप्पे या विषयावर शिक्षण परिषदेत सखोल माहिती देण्यात आली. या महत्वपूर्ण परिषदेच्या व्यासपीठावर कन्या सेलू केंद्राचे केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, के प्रा शा सेलूचे केंद्र प्रमुख विजय चिकटे, सुलभक दत्तात्रय यादव, मीरा डोळस, योगेश ढवारे आणि ज्ञानेश्वर फुटाणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या शिक्षण परिषदेमध्ये सुलभकांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये दत्तात्रय यादव यांनी मिशन उत्कर्ष व गणित निपुण नियोजनाबाबत माहिती दिली, तर योगेश ढवारे यांनी सेतू अभ्यास पूर्व चाचणी व उत्तर चाचणीचे नियोजन स्पष्ट केले. तसेच ज्ञानेश्वर फुटाणे यांनी गणित निपुण नियोजन आणि मीरा डोळस यांनी भाषा निपुण नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली. अगदी आनंददायी व कृतियुक्त सहभाग घेत सर्व सुलभकांनी या शिक्षण परिषदेत एक नवे नवचैतन्य आणले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख एकनाथ जाधव यांनी केले, तर शिक्षण परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल केंद्र प्रमुख विजय चिकटे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. या शिक्षण परिषदेला दोन्ही केंद्रातील शिक्षक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





