‘मुख्यमंत्री माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा सेलू येथे गटविकास अधिकाऱ्यांनी घेतला ऑनलाईन आढावा
सेलू I प्रतिनिधी : पालकमंत्री यांनी मांडलेल्या नागरिक केंद्रित प्रशासन व नागरिक केंद्रित आरोग्य सेवा या संकल्पनेच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी उदय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवकांची ऑनलाईन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ‘मुख्यमंत्री माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियान प्रभावीपणे राबविणे, ग्रामपंचायतींनी आरोग्य विषयात अधिक सक्रिय भूमिका घेणे तसेच आरोग्य सेवेचा केंद्रबिंदू लक्ष्यपूर्ती नव्हे तर नागरिक असला पाहिजे, यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. निधी खर्च किंवा उद्दिष्टपूर्तीपेक्षा गुणवत्तापूर्ण, संवेदनशील आणि उत्तरदायी सेवा वितरण हीच प्रशासनाची खरी ओळख असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर दि. २८ जून रोजी होणारी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही नागरिक केंद्रित आरोग्य सेवेचा पथदर्शी उपक्रम म्हणून राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत सर्व पोलिओ बूथ आकर्षक पद्धतीने सजविणे, पालकांना सकारात्मक अनुभव देणे आणि ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीच्या दोन थेंबांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व विभागांनी परस्परांशी अत्यंत समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीच्या शेवटी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चौधरी यांनी या मोहिमेच्या सूक्ष्म नियोजनाबाबत सर्व उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.





