शाखा व्यवस्थापकांच्या अरेरावीची कैफियत; ग्राहक पंचायतीची थेट मुंबई मुख्य कार्यालयाकडे तक्रार वरिष्ठ कार्यालयाला ईमेलद्वारे पाठवले निवेदन
सेलू I प्रतिनिधी : भारतीय स्टेट बँकेच्या सेलू येथील वालूर रोड शाखेत (SBIN०००३७९७) कर्ज विभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलूच्या वतीने परभणी येथील एस.बी.आय. क्षेत्रीय कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन, तसेच मुंबई येथील मादामकामा रोड, नरीमन पॉईंट येथील मुख्य चेअरमन यांना ईमेलद्वारे तक्रार सादर करत सेलू शाखेच्या व्यवस्थापकांची कैफियत मांडली आहे.
सेलू शाखेच्या कर्ज विभागात पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायतीकडे आल्या होत्या. यावरून ग्राहक पंचायत सेलूच्या वतीने शाखा व्यवस्थापक विवेक कुमार यांना विचारणा करण्यासाठी व कर्ज टेबलवर नवीन अधिकृत कर्मचारी येईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती करण्यासाठी पदाधिकारी गेले होते. मात्र, शाखा व्यवस्थापक विवेक कुमार यांच्याकडून अत्यंत अनपेक्षित आणि आडमुठेपणाचे उत्तर मिळाले.
“मागील ४० पेक्षा अधिक दिवसांपासून या टेबलवर कार्यरत असणारे प्रविण जायभाय यांची बदली झाली आहे. मी देखील नुकताच बदली होऊन या शाखेचा चार्ज घेतला आहे. आम्ही कामाच्या व्यापाने त्रस्त आहोत. कर्ज विभागाच्या या टेबलवर जोपर्यंत कोणी नवीन कर्मचारी येत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही व्यवस्था करू शकत नाही. तुम्हाला आमच्या विरोधात जी काही तक्रार करायची आहे ती आमच्या वरिष्ठांकडे करा, त्याचे उत्तर आम्ही आमच्या सिनियरला देऊ; पण आम्ही या बाबतीत काहीही करू शकत नाही,” अशा शब्दांत व्यवस्थापकांनी ग्राहकांना वागणूक दिली.
वास्तविक पाहता, या टेबलवरून गृह कर्ज, पेन्शन कर्ज, सोने तारण कर्ज, पीक विमा, पीएम सूर्य घर योजना आणि विविध सरकारी योजनांची कर्जे यापूर्वी कार्यरत असणारे प्रविण जायभाय अत्यंत सहज व सुलभतेने मंजूर करत होते. तसेच यापूर्वीचे शाखा व्यवस्थापक गावढे साहेब यांचेही ग्राहकांना मोठे सहकार्य लाभत होते. तथापि, गेल्या ४० हून अधिक दिवसांपासून या टेबलवर कर्ज मागणीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच विद्यमान व्यवस्थापकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची मात्र मोठी कोंडी झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.





