कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष
केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे एक जुलै रोजी कृषी महाविद्यालय, सेलूच्या रावे (ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम) उपक्रमांतर्गत कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण आष्टकर हे होते, तर मंचावर प्रभावती घुगे आणि प्रणिता गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक शरद ठाकर यांनी सांगितले की, आपल्या शिक्षणाचा उपयोग शाश्वत शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी झाला पाहिजे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबरोबरच उत्पादित मालाची सक्षम विपणन व्यवस्था निर्माण करण्याचे धडे देणे ही काळाची गरज आहे.कृषी दिनानिमित्त गावातून शेती, जल व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात घोषणा देत उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात वृक्षारोपण केले.
याप्रसंगी आधुनिक शेती, शाश्वत कृषी पद्धती आणि मृदा आरोग्य या संदर्भात अनिकेत गोरे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. तर पीक संरक्षण, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृषीविषयक मोबाईल ॲप्स आणि विविध शासकीय योजनांविषयी आदित्य घुगे यांनी मार्गदर्शन केले. हा उपक्रम प्राचार्या डॉ. ए. ए. चव्हाण, डॉ. एन. एन. चव्हाण आणि डॉ. ए. एस. भोसले यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव वाघ यांनी केले, प्रास्ताविक आशिष गिरी यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन नरेंद्र दुधमोगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वजीत घाडगे, अतुल राठोड आणि हसन शेख यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेती व पर्यावरण संवर्धनाबाबत मोठी जनजागृती झाली असून, विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी भरभरून कौतुक केले आहे.





