
सेलू (जि.परभणी) शहरातील नगरपरिषद कर्मचारी गणेश मंडळाच्या गणरायांची सोमवारी सायंकाळी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.
परभणी : परभणी शहरासह जिल्हाभरात सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायांच्या स्वागताच्या निमित्ताने गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. ठिकठिकाणी वाजतगाजत सायंकाळी उशिरापर्यंत बाप्पांचे आगमन झाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून गणेश मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात येत होती. सोमवारी घराघरात तसेच सार्वजनिक मंडळांत श्रींचे आगमन झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पारंपरिक पद्धतीने श्री ची स्थापना करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागात अनेक गणेश मंडळाच्या वतीने भव्य मंडप उभारण्यात आले असून देखावे आणि लक्षवेधी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. रक्तदान शिबिर, सामाजिक जनजागृती, वृक्षारोपण, निराधारांना मदत, व्याख्यान, प्रबोधन अशा अनेकविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोसवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने परभणी पोलिसांनी मोठी तयारी केली आहे. ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मागील महिन्याभरापासून परभणी जिल्ह्यात पावसाने मोठी उघडीप दिली असली तरी, गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. दरम्यान, शनिवारी व रविवारी काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी झाल्या. मात्र करपून चाललेल्या खरीप पिकांना जीवदानासाठी मोठ्या पावसाची आस शेतकऱ्यांसह आता गणेशभक्तांनाही लागली आहे.




