नूतन विद्यालयात श्रीराम भांगडिया शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त व्याख्यान
सेलू: दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांचे जीवनकार्य स्वातंत्र्य आंदोलन, हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रिय योगदान देणारे आणि संविधानातील मूल्यांवर निष्ठा ठेवणारे होते. ते केवळ विचारांवर नव्हे, तर कृतीवर अधिक भर देत असत, असे मत प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती आणि संविधान दिनानिमित्त नूतन विद्यालयाच्या रा.ब. गिल्डा सभागृहात २६ नोव्हेंबर रोजी ‘श्रीरामजी भांगडिया यांचे जीवन – कार्य’ या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी यांनी भांगडिया यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी नगर परिषदेचे अध्यक्ष असताना शहरात पक्के सिमेंट रस्ते, स्वच्छता अभियान आणि सर्वोदय नगरात ९५ गरजू नागरिकांना मोफत घरे दिली. तसेच, शिशू विहार, ४ बालवाड्या, महिलांसाठी ग्रंथालय, कन्या प्रशाला आणि महाविद्यालय सुरू करून त्यांनी लोकशिक्षण आणि समाजसेवा यात मोठे योगदान दिले.
संविधान दिनानिमित्त डॉ. सुरेश हिवाळे यांनी संविधानाचे महत्त्व सांगून उद्देशिकेचे वाचन केले. यानिमित्ताने संस्थेच्या परिसरात स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण उपक्रमही राबवण्यात आले.




