
प्रखर प्रकाशामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना धोका; इरफान शेख यांचे संबंधित विभागाला साकडे
फुलचंद भगत, वाशिम : मंगरुळपीर शहरासह परिसरातील विविध मार्गांवर अनेक वाहनांवर नियमबाह्य व प्रखर प्रकाश देणाऱ्या प्रतिबंधित एलईडी लाईटचा सर्रास वापर सुरू असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रखर प्रकाशामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊन काही क्षणांसाठी रस्त्याचा अंदाज न येण्याची शक्यता असते. त्यामुळे गंभीर अपघात घडून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांवर अत्यंत प्रखर एलईडी लाईट लावून वाहने चालविली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. काही वाहनधारक वाहनांच्या मूळ प्रकाशयंत्रणेत बदल करून अतिरिक्त व अधिक क्षमतेचे दिवे बसवत आहेत. या दिव्यांचा प्रकाश समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर थेट पडत असल्याने काही काळ दृष्टी अस्पष्ट होते. परिणामी अचानक समोर आलेले वाहन, पादचारी अथवा रस्त्यावरील अडथळे दिसून न आल्याने अपघाताची शक्यता वाढते.“वाहनांवरील अशा प्रतिबंधित एलईडी लाईटचा वापर हा केवळ नियमभंग नसून इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारा प्रकार आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तपासणी व कारवाईची मोहीम राबवावी,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे शहराध्यक्ष इरफान शेख यांनी केली आहे.शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, मुख्य रस्ते तसेच शहराबाहेरील मार्गांवर रात्रीच्या वेळी विशेष तपासणी मोहीम राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. वाहनांची तपासणी करून नियमबाह्य एलईडी लाईट आढळल्यास संबंधित वाहनधारकांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच अशा दिव्यांचा वापर पुन्हा होऊ नये यासाठी जनजागृतीही करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक वाहनधारकाची जबाबदारी असून, स्वतःच्या सोयीसाठी इतर वाहनचालकांच्या जीविताशी खेळणे योग्य नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस व संबंधित परिवहन विभागाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तातडीने कठोर कारवाईची मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधूनही होत आहे.





