सेलू तालुक्यातील धनेगाव शिवारातील घटना, तीन लाखाचे नुकसान
सेलू | परभणी : सेलू तालुक्यातील धनेगाव येथे अचानक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत रामभाऊ देविदासराव कटारे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत शेत आखाड्यावरील बैलजोडीसह कापूस आणि सोयाबीन जळून खाक झाले असून, शेतकरी कुटुंबावर मोठे अर्थिक संकट कोसळे आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील धनेगाव शिवारातील शेत गट क्रमांक १४१ मधील शेतकरी रामभाऊ देविदासराव कटारे यांच्या आखाड्यावरील गोठ्यास गुरुवारी, १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, या ठिकाणी बांधलेली एक बैलजोडी आगीत मृत्यूमुखी पडली. जवळपास १५ क्विंटल कापूस आणि आठ क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे. १ लाख २० हजार रूपये किंमतीची बैलजोडी व १ लाख साठ हजार किमंतीचा शेतीचा माल असे एकूण दोन लाख ऐंशी हजार रूपयाचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे धनेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मंडळाधिकारी विजय बोधले यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकरी रामभाऊ कटारे यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.





