राज्यसभा खासदार डॉ. रामरावजी वडकुते यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला संघटनेत महत्त्वाची जबाबदारी
हिंगोली/गोपाल सातपुते : शहरातील विवेकानंद नगर येथील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते तथा राज्यसभा खासदार डॉ. रामराव वडकुते यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले हरिहर किशनराव लेकुळे यांची भाजपा ओबीसी मोर्चा, हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राज्यसभा खासदार डॉ. रामराव वडकुते, भाजपा हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव घुगे आणि आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच भाजपा ओबीसी मोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते यांच्या नेतृत्वाखाली हरिहर लेकुळे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच ओबीसी समाजामध्ये पक्षाची विचारधारा आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी लेकुळे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने भाजपा ओबीसी मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष हरिहर किशनराव लेकुळे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून हिंगोली जिल्ह्यात ओबीसी समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ ढाले, भाजपा पदवीधर नोंदणी जिल्हा संयोजक गुलाबराव भोयर, कडूजी पाटील, करण गडदे, रामेश्वर गायकवाड यांच्यासह भाजपा ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी हरिहर लेकुळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.





