दिपाली पोटे, खानसा पठाण यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार
सेलू : येथील नूतन महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केली आहे. या विभागातील दिपाली तुकाराम पोटे आणि खानसा पठाण यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर भारतीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार पटकावला आहे.
गंगाखेड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित “जीवन विज्ञानातील अलीकडील प्रगती” या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या परिषदेत देशभरातील संशोधक आणि तज्ज्ञ उपस्थित होते.या परिषदेदरम्यान सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी दिपाली तुकाराम पोटे आणि द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी खानसा पठाण यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर भारतीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार (Best Student Award) पटकावला. राष्ट्रीय स्तरावरील या मानाच्या पुरस्काराबद्दल दोन्ही विद्यार्थिनींचा गौरव शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन महाविद्यालयातील एकूण १४ विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग घेऊन आपल्या विभागाचा नावलौकिक वाढवला.या यशाबद्दल नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. यू. सी. राठोड, उपप्राचार्य डॉ. आर. एम. खाडप, समन्वयक डॉ. एन. एस. पद्मावत आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश कंठाळे यांनी डॉ. अमित कुलकर्णी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





