सेलू तालुकास्तरीय स्पर्धा : ‘हरित तंत्रज्ञान’ विषयावर प्रभावी नाट्यसादरीकरण
सेलू : विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक घडामोडी आणि संकल्पना सोप्या भाषेत व मनोरंजक पद्धतीने सर्वांसमोर याव्यात, या हेतूने तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत “आनंदाचं झाड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारडीच्या उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.शाळेच्या संघाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवासाठी झाली असून, ही स्पर्धा राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५-२६ अंतर्गत राष्ट्रीय संग्रहालय परिषद भारत सरकार व नेहरू विज्ञान केंद्र, वरळी (मुंबई) तसेच शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येते.पारडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘हरित तंत्रज्ञान’ या विषयावर प्रभावी नाट्यसादरीकरण सादर केले. आजच्या दैनंदिन जीवनात हरित तंत्रज्ञानाचा उपयोग, फायदे व सुलभता त्यांनी उत्कटतेने मांडत प्रेक्षकांचे मन जिंकले.या विजयी संघात ईश्वरी राठोड, कल्याणी आडे, प्रयास माने, साक्षी राठोड, खुशी राठोड, सचिन राठोड, स्वाती राठोड व ममता राठोड या विद्यार्थ्यांचा समावेश होता. मुख्याध्यापक डी. के. कुलकर्णी तसेच शिक्षक गणेश आकलोड, योगेश काळे, बाळासाहेब पंडित, सय्यद करीम, कैलास खजिने, विठ्ल शेळके, श्याम रूपणर ,संजय काकडे, आणि युवराज माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी मनोज, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, सेलूचे केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, तालुका समन्वयक सुनीता काळे, तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुख अंजली पद्माकर, परीक्षक उपेंद्र बेल्लूरकर, रामेश्वर चोथे, देशमुख, नूतन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे , सुरेश हिवाळे, काशिनाथ पल्लेवाड आदींची उपस्थिती होती. सरपंच नीलाताई आडे, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव राठोड, शिवाजीराव लंघे, माऊली राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल राठोड आदींनी विजय संघातील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.





