
फुलचंद भगत, वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील निर्मला देवी जैन पूर्व प्राथमिक शाळेत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा तसेच विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या निरागस कला-कौशल्यातून कार्यक्रमात आकर्षक सहभाग नोंदविला.चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुंदर वेशभूषा, नृत्य, गीत, कृष्णाच्या बाललीलांवर आधारित सादरीकरण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेच्या परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पालक, शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद लुटला.कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराचे उपस्थित पालक व मान्यवरांनी कौतुक केले. चिमुकल्यांच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांची सुंदर झलक पाहायला मिळाली.या कार्यक्रमासाठी शाळेच्या सचिव सौ. अनिता कर्नावट यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रियंका गोंडाळ, सौ. स्मिता कुलदीप तोडरवाल, बजाज ताई, सरदार ताई, सोळंके ताई, भोयर मॅडम यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी संचालन येवले मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन कराळे मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कृष्ण जन्मोत्सव आनंदात व उत्साहात पार पडला.



