सेलूमध्ये ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा; भाविकांचा मोठा सहभाग
सेलू : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती सोमवारी, ३० मार्च रोजी सेलू शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा आणि पालखी मिरवणुकीत महिला, तरुण, मुले आणि सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील जैन मंदिरापासून सकाळी आठच्या सुमारास शोभायात्रेला सुरुवात झाली. सजवलेल्या पालखीतून भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यासोबत अहिंसा रथ सहभागी झाला होता. ठिकठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने मागील चार दिवसांपासून जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जलाभिषेक, स्वाध्याय, ध्वजारोहण, अभिषेकपूजन आणि भजन संध्या आदी उपक्रमांचा समावेश होता. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तसेच आदिनाथ गोशाळेला चारावाटप करून सामाजिक संदेश देण्यात आला. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शहरातील सकल जैन समाज बांधवांनी पुढाकार घेतला.फोटो…सेलू शहरात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला.




