नूतन इंग्लिश स्कूलचे ‘बाहेती बिहाणी’ नाव वगळणार
सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन इंग्लिश स्कूलचे ‘बाहेती बिहाणी’ नाव काढून टाकण्यात येईल, असे लेखी आश्वासन संस्थेकडून मिळाल्यानंतर काजळी रोहिणा (ता.सेलू) येथील कीर्तनकार प्रसाद महाराज काष्टे यांनी तिसऱ्या दिवशी शनिवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.
यावेळी शिक्षण विभाग, महसूल प्रशासन, पोलिस अधिकारी लोकप्रतिनिधी आणि संस्था पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. नूतन इंग्लिश स्कूलला दिलेले ‘बाहेती बिहाणी’ नाव काढून टाकावे या प्रमुख मागणीसह संस्थेतील कथित बोगस शिक्षक भरती तसेच विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून (१३ ऑगस्ट) नूतन विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर काष्टे महाराज यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषण मागे घेतल्यानंतर अन्य मागण्यांसाठी लढा सुरूच राहणार असल्याचे काष्टे महाराज यांनी स्पष्ट केले.





