परभणी फाउंडेशनचे आवाहन
परभणी : जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे संकटात सापडलेल्या बांधवांना दिलासा देण्यासाठी परभणी फाउंडेशनने ‘एक हात मदतीचा’ ही मदत मोहीम सुरू केली आहे. २८ सप्टेंबर रोजी फाउंडेशनने नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी जीवनावश्यक किट किंवा त्यातील साहित्य देऊन पूरग्रस्तांना मदत करावी. एका किटमध्ये साबण, डिटर्जंट, चिवडा, बिस्किटे, पॅरासिटामोल गोळ्या, टूथपेस्ट, मच्छर अगरबत्ती आणि मेणबत्त्या या वस्तूंचा समावेश आहे. नागरिक त्यांच्या सामर्थ्यानुसार एक किंवा अधिक किट देऊ शकतात. छोट्याशा मदतीनेही पूरग्रस्त कुटुंबांना मोठा आधार मिळेल. मदतीचे साहित्य जमा करण्यासाठी बाईक पॉईंट जवादे हॉस्पिटल समोर (वसमत रोड), ज्ञानवर्धिनी अभ्यासिका (जुना पेडगाव रोड) आणि पी. के. सोल्युशन (जिंतूर रोड) या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन परभणी फाउंडेशनने केले आहे.





