राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी
सेलू : मतदार पुनर्रिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील मतदार यादीतील त्रुटी दूर करून बोगस नावे वगळण्यात यावीत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सेलू तालुक्यात शिक्षणासाठी किंवा मजुरीसाठी बाहेर जिल्हे तसेच इतर राज्यांतून आलेल्या नागरिकांची नावे जिंतूर-सेलू मतदार संघात समाविष्ट आहेत. अशा बोगस मतदारांची नावे शोधून ती तात्काळ कमी करावीत आणि संबंधित व्यक्तींवर नियमानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या : * मतदार यादीतील अनोळखी नावांची तातडीने शहानिशा करून ती वगळण्यात यावीत. * विवाहित महिलांची नावे सासरी आणि माहेरी अशा दोन्ही ठिकाणी असल्यास, ती नियमानुसार एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत. * सन २००२ च्या यादीतील पुराव्यांची पडताळणी करूनच नवीन मतदारांची नावे समाविष्ट करावीत. * अनेक मतदारांची नावे दोन ठिकाणी असल्याने, त्यांची शहानिशा करून एकाच ठिकाणी नोंद ठेवावी. * मयत मतदारांची नावे यादीतून तात्काळ कमी करण्यात यावीत. * मतदारांचे [आधारकार्ड] ज्या ठिकाणचे आहे, त्याच ठिकाणी त्यांचे नाव कायम ठेवावे आणि या प्रक्रियेत बोगस [आधार कार्ड] असल्यास त्याची सखोल तपासणी करावी.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरुषोत्तम पावडे, प्रकाशराव मुळे, चंद्रकांत गाडेकर, प्रशांत नाईक, जीवन आवटे, सुधाकर रोकडे, शुभम कदम, दिलीप शेवाळे, अनिरुद्ध नाईक, रामेश्वर गाडेकर, बालाप्रसाद राठोड, मदनराव पवार, शिवाजी गिनगीने, श्रीधर गिनगीने, संजय बहिरट, शामराव डख, कौतिक कुलकर्णी, मनोज गाडेकर, बाळासाहेब मुसळे, प्रविण महाजन, सुभाष वायगुंडे, सर्जेराव शेरे, अशोक पवार, हरीभाऊ सपाटे, सुनील रोडगे, संतोष मोहरीर, बालासाहेब जावळे, शेख नाजर, ओम कदम, गुलाबराव गाडेकर, मजितभाई बागवान, भागवत बालटकर, गजानन कोरडे, लक्ष्मण खरात, दिपक गाडेकर, वैजनाथ कोरडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





