सेलू : मागील तीस वर्षांपासून नगरपालिका राजकारणात सक्रिय असलेले माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार विनोद बोराडे हे प्रभाग क्रमांक ८ अ मधून पराभूत झाले आहेत. कॉंग्रेसच्या मिलिंद पवार यांनी येथे विजय साकारला असून बोराडे यांना ८८ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि जिल्ह्याच्या पालक मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळ्ण्यात त्यांना यश आले. नगराध्यक्ष पदी मिलिंद सावंत यांच्यासह १४ उमेदवारांचा विजय साकारण्यात त्याचे मोठे योगदान आहे. त्यांचा पराभव हूरहूर लावणारा आहे.
बोराडे यांचे पुतणे साईराज बोराडे यांनी प्रभाग क्रमांक एक ब मध्ये दणदणीत विजय साकारला आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांची पत्नी महानंदा आणि सुपुत्र माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांनीही दणदणीत विजय मिळवला आहे, तर आडळकर यांचे जावई आणि माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचे सुपुत्र माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाने (शिवसेना शिंदे गट) यांनीही विक्रमी मतांनी विजय साकारला आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण हेदेखील पराभूत झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे डॉ.अनिकेत जोगदंड यांनी त्यांचा पराभव करीत विजयश्री खेचून आणली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने लहाने यांच्या नेतृत्वाखाली संदीप लहाने आणि सपना हरि काळे,अनुपमा प्रभाकर देवधर आणि डॉ. अनिकेत अशोकराव जोगदंड यांनी विजय मिळविला आहे. कॉंग्रेसच्या अन्य विजयी उमेदवारात प्रविणा संभाजी पवार, विनोद धापसे, पठाण मालनबी अफसरखान, सफिया बेगम अ.रशीद यांचा समावेश आहे. शिवसेना उबाठाच्या दोन्ही उमेदवारांना तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांच्या उमेदवारांचाही दारूण पराभव झाला आहे.





