गोवंशाची कत्तल करणारे सात जण ताब्यात, १३ जिवंत गोवंश प्राण्यांची सुटका; ४ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त
सेलू जि.परभणी : सेलू येथील इकबाल नगर परिसरातील सेलू् नगरपालिकेने कत्तलखान्यात (कमेला) सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलीवर सेलू पोलिसांनी गुरुवारी, २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी मोठी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ४ लाख १४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह १३ जिवंत गोवंश प्राण्यांची सुटका केली असून, ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
२२ जानेवारी रोजी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास इकबाल नगरमधील कत्तलखान्यात गोवंश प्राण्यांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत, गणेश पवार, शाकीर शेख, कीर्तेश्वर तेलंग, नितीन राठोड, मधुकर जाधव, सुरेश पुलाते, अजय रासकटला, कुंडलिक साबळे, शिपाई बाळू कोपनर, जगन्नाथ मुंडे, अतीक शेख व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. छापा टाकला असता, आरोपी गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आले. तसेच कत्तलखान्यासमोर असलेल्या पत्राच्या कंपाऊंडमध्ये अनेक जनावरे निर्दयीपणे उपाशी बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २,९९,००० रुपयांचे मांस आणि साहित्य जप्त केले आहे. यामध्ये अंदाजे ६५० किलो गोवंश मांस आणि हाडे. दरम्यान, कत्तलीसाठी वापरलेले दोन रिक्षा (एम एच ०७ ए एच ४०६० आणि एम एच २० बीपी ८९२१, ८ कुऱ्हाडी, १४ सुरे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. यासोबतच, १,१५,००० रुपये किमतीचे एकूण १३ जिवंत गोवंश प्राणी (बैल, गाय, गोऱ्हे आणि कारवड) जप्त करून त्यांची सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी सपोउपनि किर्तेश्वर तेलंग यांच्या फिर्यादीवरून अब्दुल रहेमान बाबु कुरेशी, साबेर शरीफ कुरेशी, साहील खलील कुरेशी, शफीक खलील कुरेशी, इब्राहीम हिराजी कुरेशी, कुरेशी उमर मालनजी आणि कुरेशी गौस जलील या सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाकीर हिराजी शेख करत आहेत. ही कारवाई महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील विविध कलमान्वये करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.





