२९ वर्षांच्या प्रदीर्घ ज्ञानदानानंतर सेवानिवृत्ती; मान्यवरांच्या उपस्थितीत भावुक निरोप
परभणी : महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तब्बल २९ वर्षे शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करणारे सुरेश फकिरराव तांबोळी नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त विद्यालयात सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अजयराव गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य लखनसिंह जाधव होते. यावेळी तुळशीराम वानरे, कैलासराव लोनसने, दादासाहेब मेश्राम, विलासराव चट्टे पाटील मिर्झापूरकर, रमेशराव नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना तांबोळी यांनी २९ वर्षांच्या आठवणींना उजाळा देत महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी आमदार विजयराव गव्हाणे, स्वराज्यसिंह परिहार, आपले बंधू व वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सोहळ्याच्या पुढाकाराबद्दल लखनसिंह जाधव, प्रदीप चव्हाण आणि एन. के. चापके यांचे विशेष आभार मानले.या प्रसंगी विविध शाखांचे राजेंद्र गहाळ, सोनाजी खनपटे, अंकुशराव मोगरे, शिवाजीराव वीरसे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र गहाळ यांनी, सूत्रसंचालन शिवाजीराव वीरसे यांनी तर आभार प्रदर्शन एन. के. चापके यांनी केले.





