आर.पी. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी विभागाचे उद्घाटन, अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
परभणी, दि. २२ : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून आर. पी. हॉस्पिटल येथे हिस्टोपॅथोलॉजी विभागाचे उद्घाटन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ही उच्च दर्जाची लॅब परभणीच्या वैद्यकीय क्षेत्रात एक वरदान ठरणार आहे.हिस्टोपॅथोलॉजी विभाग हा अचूक निदानाचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो.
शस्त्रक्रियेदरम्यान काढण्यात आलेल्या पेशी, ऊती, गाठी किंवा बायोप्सीच्या नमुन्यांची सूक्ष्म तपासणी करून कर्करोगाचे स्वरूप आणि त्याची तीव्रता निश्चित करण्यासाठी याचा उपयोग होतो. विशेषतः कर्करोगाचे निदान, कर्करोगाचा प्रकार व ग्रेड निश्चित करणे, तसेच उपचाराची योग्य दिशा ठरविण्यासाठी या तपासणीला अत्यंत महत्त्व आहे. आर. पी. रुग्णालयामध्ये सर्जरी, स्त्रीरोग, युरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, त्वचारोग यांसह विविध विभागांमधून दररोज बायोप्सी व शस्त्रक्रियेद्वारे ऊतींचे नमुने तपासणीसाठी येतात. त्यामुळे रुग्णालयातच अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी सुविधा उपलब्ध असल्याने निदान प्रक्रियेत होणारा विलंब कमी होतो आणि संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना वेळेत अचूक अहवाल उपलब्ध होऊन रुग्णाच्या उपचाराची पुढील दिशा त्वरित निश्चित करता येते.या नवीन विभागामुळे कर्करोग (कॅन्सर), गाठी आणि विविध गंभीर आजार यांचे अत्यंत अचूक व जलद निदान आता परभणीतच शक्य होणार आहे. यामुळे रुग्णांना उपचारासाठी किंवा पुढील तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर, पुणे किंवा मुंबईसारख्या इतर मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही; परिणामी रुग्णांचा बहुमूल्य वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत, असा विश्वास आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केला.”या अत्याधुनिक विभागाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.
शरीरातील कोणत्याही गाठीचा वेळीच आणि अचूक निदान झाल्यास उपचाराची दिशा निश्चित करणे सोपे होते. नागरिकांनी कुठल्याच गाठीकडे दुर्लक्ष न करता वेळेवर डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घ्यावी जेणेकरून ती कर्करोगाची असल्यास ती पसरण्याआधी काढून टाकून योग्य इलाज करावा,” असे आवाहन डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले. या उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, प्राध्यापक डॉ. सुशील दोडके, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. पल्लवी दोडके, डॉ. सनोबर खान, डॉ. विजय शेळके, डॉ. कृष्णप्रिया यांच्यासह संस्थेचे प्रशासकीय अधिकारी गुणवंत अहिरे, विभागीय अधिकारी विशाल आहेर उपस्थित होते.





